
दिवाण खवटी येथे सोनसाखळी चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक
खेड : कोकण रेल्वे मार्गावरील तालुक्यातील दिवाण खवटी रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या कोकणकन्या गाडीत बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन साखळी चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्यास जेरबंद करण्यात यश आले. ही घटना २० मे रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
साईनाथ राधाजी साळुंखे (वय ४५, रा. धायगाव ता. वैजापुर जि. संभाजीनगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. कोकणकन्या एक्सप्रेसमधून महिला मुंबई ते मडगाव असा प्रवास करीत असताना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दिवाणखवटी येथे गाडी आली असता चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला प्रवाशांनी पकडले. दिवाणखवटी स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांमधून मंगळसूत्र आणि अन्य मुद्देमाल चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या चोऱ्यांमध्ये पकडलेल्या चोरट्याचा समावेश आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.