
दापोलीत विवाहितेचा मृत्यू, घातपाताचा संशय
दापोली:- दापोली तालुक्यातील वणंद लोवरेवाडी येथील भाग्यश्री दशरथ लोवरे (वय-50) यांचा संशयास्पद मृत्यू ओढवला असून नातेवाईकांना घातपाताचा संशय आहे. त्या पाळंदे येथे हॉटेल कामाला होत्या. रविवारी त्यांचा मृत्यू झाला.त्यांचा मुलगा दर्शन दशरथ लोवरे यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. भाग्यश्री यांचा मुलगा आणि सून कामानिमित्त मुंबईला असल्याने घरी त्या एकटाच राहत होत्या. गेले काही वर्ष पाळंदे येथे त्या हॉटेलच्या कामानिमित्त जात होत्या. गावातीलच ओळखीच्या एका व्यक्तीशी काही आर्थिक देवाण-घेवाण केल्याचीही चर्चा समोर आली आहे.
भाग्यश्री यांची एक चप्पल घरातून बेपत्ता असल्याने संशय अधिक बळावला आहे. भाग्यश्री यांना पाळंदे येथील एका व्यक्तीने घरी सोडले असल्याचेही चर्चा आहे. मात्र त्या दिवसापासूनच भाग्यश्री घराच्या बाहेर पडल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू नसून घातपात झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गाडीवरून ज्या व्यक्तीने त्यांना घरी सोडले होते, त्या व्यक्तीकडे मुलीचे, सुनेचे व मयत भाग्यश्रीचे दागिने ठेवल्याची चर्चा आहे तसेच तीन लाख रुपये त्या व्यक्तीकडे असल्याचेही बोलले जात आहे.