
दुचाकी चोरीच्या टोळीतील अन्य दोघांना पकडण्यात पोलिसांना यश
राजापूर :दुचाकी चोरून कोल्हापूरच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांना पाहून अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या अन्य दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. सलग दोन दिवस जंगलात शोधमोहीम राबविल्यानंतर सोमवारी सकाळी दीपक श्रीमंदीलकर आणि अजय घेगडे (दोघेही रा. पारनेर- अहमदनगर) या दोन चोरट्यांना. पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शनिवारी दोन दुचाकींवरून तीन अनोळखी तरुण ओणीमध्ये आले होते. त्यांनी पिस्तुलसारख्या दिसणाऱ्या लायटरने ओणीमधील एका-दोघांना धमकवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराची माहिती राजापूर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरली होती. दरम्यान ओणीवरून अणुस्कुरा घाटाच्या दिशेने दोन दुचाकींवरून तिघेजण मार्गस्थ होत असताना अणुस्कुरा येथील चेकपोस्टवर पोलीस पाहून ते हबकले आणि त्यांनी येरडवच्या दिशेने पलायन केले. वाटेतच दोन्ही दुचाकी सोडून ते आजूबाजूला असलेल्या जंगलात जाऊन लपले.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौजफाटा तैनात करून येरडवसह अणुस्कुरा घाटात शोधमोहीम राबविण्यात आली. शोध सुरू असताना एकजण पोलिसांच्या तावडीत सापडला तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर अन्य दोघे जंगलात लपून बसले होते.
शनिवार रात्रीपासून पोलीस तसेच आरसीपी टीम या दोघांचा शोध घेत होती. अखेर सोमवारी सकाळी हे दोघे जंगलातून बाहेर येऊन कोल्हापूरच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.