
जगबुडी पुलावर कंटेनरची जोरदार धडक; चालक पडला थेट नदीपात्रात
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर भरणे येथील जगबुडी पुलावर कंटेनरला अपघात होऊन चालक नदीपात्रात कोसळला. हा अपघात शनिवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातानंतर चालक पुढील काचेतून नदीपात्रात कोसळला.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालेला कंटेनर भरणेनाका येथील उड्डाणपुलावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर वेगाने जगबुडी पुलावर धडकला. ही धडक एवढी भीषण होती की, चालक कंटेनरच्या फुटलेल्या पुढील काचेतून उडून नदीपात्रात कोसळला.
दरम्यान, या अपघाताची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी अपघातस्थळी धाव घेत चालकाचा शोध घेतला. त्याला नदीपात्रातून बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत खेड पोलिस स्थानकात उशिरापर्यंत नोंद करण्यात आलेली नव्हती.