
कंपनीत केमिकलने भाजलेल्या एकाचा उपचारावेळी मृत्यू
चिपळूण : गाणे खडपोली एमआयडीसीमधील कृष्णा अँटीऑक्सिडेंट्स कंपनीत केमिकल ड्रम ट्रकमध्ये भरत असताना ड्रम फाटून अपघात झाला. या अपघातात पाचजण केमिकलने भाजले. त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
संजय यशवंत सुर्वे उर्फ बाबू दादा (४९, रा. अलोरे) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात १३ मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला होता. यामध्ये संतोष कदम, संजय सुर्वे, तुषार बैकर या तिघांना डॉक्टरांच्या सल्ल्याने नवी मुंबई ऐरोली मधील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते तर अक्षय सुर्वे, अभिषेक तांबट यांना चिपळूण मधील अपरांत हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.
यातील नवी मुंबई येथे रुग्णालयात दाखल असलेले संजय सुर्वे यांचे उपचारादरम्यान बुधवारी (दि.१५) रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. गुरुवारी सकाळीअलोरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.