
जालगावमध्ये तरुणाची आत्महत्या
दापोली : तालुक्यातील जालगाव-पांगरवाडी येथे ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ च्या दरम्यान उघडकीस आली. श्याम हरिश्चंद्र वाघमारे (सध्या रा. जालगाव पांगरवाडी, मूळचा सहयोगनगर-निगडी, ता. हवेली, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष सरकटे व श्याम वाघमारे हे दोघेजण जालगाव पांगारवाडी येथे दोन महिन्यांपासून एकत्रित रहात होते. शाम याला दारूचे व्यसन होते. गेल्या २ दिवसांपासून आशिष व श्याम हे दोघे बोलत नव्हते. मंगळवारी सकाळी ६. वाजता उठल्यावर आशिषने श्याम याने लाल रंगाच्या वायरने राहत्या खोलीत गळफास घेतल्याचे दिसले. आशिषने जवळ जाऊन पाहिले असता कोणत्याही प्रकारची हालचाल दिसली नाही म्हणून त्याने दापोली पोलिसात याची खबर दिली. दापोली पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र नलावडे करीत आहेत.