
श्रमिक पतपेढीच्या मिठगवाणे शाखेवर दरोडा!
सुमारे दीड कोटी रुपयांचे जवळपास 200 तोळे सोने लंपास केल्याची माहिती
राजापूर : तालुक्यातील मिठगवाणे येथील साखर श्रमिक पतपेढीची शाखा अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना मंगळवारी घडली असून
सकाळी शाखा उघडण्यासाठी आलेल्या शिपायाच्या शाखेचा कडीकोंडा तोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने संबंधितांना माहिती दिली. याबाबत शाखा व्यवस्थापकाकडून नाटे सागरी पोलीस स्थानकात तात्काळ तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घटनास्थळी सागरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक आणि ॲडिशनल एसपी सुद्धा दाखल झाले होते. रत्नागिरी येथून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. काल संध्याकाळी उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी होते.
शाखेतील सोने ठेवण्याचे लॉकर फोडण्यात आले असून त्यातील जवळपास 200 तोळे सोने चोरल्याची तक्रार झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुसरे पैशाचे लोकर मात्र तोडण्यात आले नसल्याची माहिती आहे. सदरची शाखा ही श्री देव अंजनेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असून फारशी वर्दळ या भागात नसते. याचाच फायदा घेऊन पतपेढी फोडल्याचा संशय व्यक्त होत आहे. जवळपास दीड कोटी रुपयाचा हा डल्ला असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून याबाबत तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.