
वेरळ येथे ६ हजाराचा गुटखा जप्त
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ येथील रस्त्यालगतच्या गणेश कृपा हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका पानटपरीमध्ये छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकली. या धाडीत ५ हजार ५५२ रूपयांचा साठा व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले.
या प्रकरणी सुनील शंकर भोसले (५५) याच्यावर येथील पोलीस स्थानकामध्ये शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. तो विमलपान मसाला, तंबाखू गुटखा आदी नशाकारक पदार्थांची पानटपरीमध्ये आस्थापना बंद न करता उशिरापर्यंत चालू ठेवून गुटख्याची विक्री करत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. या धाडीत त्याच्याकडील ५,५५२ रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईने बेकायदेशीरपणे गुटखा विकणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.