
घराच्या बांधकामाच्या वादातून तिघांची एकाला मारहाण
खेड : तालुक्यातील खोपी तांबडवाडी येथील संतोष कृष्णा भोसले हे आपल्या घराचे बांधकाम करत असताना या बांधकामास तिघांनी हरकत घेऊन संतोष भोसले यांना मारहाण केली. यात ते जखमी झाले. हि घटना 1 मे रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडली. संतोष भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सूर्यकांत तुकाराम भोसले , उमेश तुकाराम भोसले व एक महिला ( रा. खोपी तांबडवाडी ) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
संतोष कृष्णा भोसले यांना घराचे बांधकाम करण्यास हरकत घेऊन त्यांना सुर्यकांत भोसले यांनी हाताने ठोशाने डाव्या गालावर जोरात बुक्की मारल्याने त्यांच्या डाव्या बाजूची दाढ तुटून त्यातून रक्त येऊन दुखापत केलेली आहे. तसेच उमेश भोसले यांनी संतोष भोसले यांच्या छातीवर जोरात हाताच्या ठोशाने बुक्की मारून शिवीगाळी, दमदाटी केली. सुर्यकांत भोसले हा कोयती घेऊन संतोष भोसले यांना मारण्यास येत असल्याचे पाहुन संतोष भोसले पळत होते यावेळी एका महिलेने संतोष भोसले याला दगड फेकून मारल्याने तो दगड संतोष याच्या पाठीवर लागून मुका मार लागला आहे. संतोष यांच्या घराचे काम करण्यासाठी आलेल्या कामगार सुधीर मनोहर जंगम याला सूर्यकांत भोसले व उमेश भोसले यांनी शिवीगाळी करून हाताचे ठोशाने अंगावर, छातीवर जोरात बुक्की मारून त्यांना ढकलाबुकल केली. तसेच कामगार विशाल कदम याला शिवीगाळी करून त्या दोघांना इथे येऊन घराचे काम करायचे नाही , तुम्ही इथून निघून जा, अशी धमकी देऊन त्यांना जाण्यास सांगितले, यावेळी सुर्यकांत भोसले यांनी फिर्यादी संतोष भोसले यांना घराचे बांधकाम करण्यास सुरुवात केलीस तर गोळी घालून ठार मारून टाकीन अशी धमकी दिली, याप्रकरणाी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास येथील पोलीस करत आहेत.