
ॲड. प्रकाश आंबेडकर आज रत्नागिरीत
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती जोशी यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे रत्नागिरी जिल्ह्यात येत असून, बुधवारी (दि. १) रत्नागिरी शहरातील स्वा. सावरकर मैदान, गाडीतळ येथे त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती तालुका महासचिव मुकुंद सावंत यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत रणधुमाळी सुरू असून, वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मारुती काका जोशी यांचा प्रचारही वेगात सुरू आहे. या मतदासंघातील लढत ही रंगदार होणार आहे. महायुतीकडून नारायण राणे, महाविकास आघाडीकडून विनायक राऊत तर वंचित बहुजन आघाडीनेही पुन्हा एकदा मारूती जोशी यांना रिंगणात उतरविल्याने राणे तसेच राऊत यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. राज्यातील लोकसभेसाठी जाहीर केलेल्या आपल्या उमेदवारांसाठी ॲड. आंबेडकर हे प्रचारात उतरलेले पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीत मारूती जोशी यांच्या प्रचारार्थ दि. १ मे रोजी सकाळी १० वाजता जाहीर सभा आहे. या सभेला प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ते कोकणातील अनेक विषयांवर ते भाष्य करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. रिफायनरी प्रकल्पाविरोधी आंदोलकांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांनी विनाशकारी प्रकल्प कोकणात लादू नये, अशी ठाम भूमिका या पूर्वीच घेतली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर या सभेत नेमका कोणावर निशाणा साधणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.