
रत्नागिरीसह अनेक ठिकाणी नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीतील सात जणांना अटक
रत्नागिरी:- सरोगसीच्या माध्यमातून नवजात बालकाची विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. डॉक्टरसह सात जणांना पोलिसांनी अटक केली. त्यात चार महिला आहेत. डॉ. संजय खंदारे, वंदना पवार, शीतल वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसीमा खान, लता सुरवाडे, शरद देवर अशी त्यांची नावे आहेत. सरोगसी प्रकरणी ठाण्यातील दोन रुग्णालये हे पोलिसांच्या रडारवर आहेत. या टोळीने रत्नागिरी, मुंबई, हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे त्या मुलाची विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे.
विक्रोळी येथे एक महिला राहते. तिला शीतलने पाच महिन्याच्या बाळाची विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळण्यात आली. पोलीस उपायुक्त रागासुधा, दत्ता नलावडे, क्राईम ब्रंच युनिट दोनचे प्रभारी निरीक्षक दिलीप तेजनकर, महिला निरीक्षक भोर, दिनेश शेलार, शीतल पाटील, आदी पथकाने तपास सुरु केला. पोलिसांनी शीतलला ताब्यात घेतले. तिच्या चौकशीत डॉ. खंदारे चे नाव समोर आले. पोलिसांनी खंदारे याना ताब्यात घेतले. वंदनाच्या माध्यमातून रत्नागिरी येथे राहणाऱ्या जोडप्याला ते मूल दोन लाखात विकल्याचे समोर आले. पोलिसांचे पथक रत्नागिरी येथे गेले व पोलिसानी ते मूल ताब्यात घेतले. त्याच दरम्यान पोलिसांना या टोळीची माहिती मिळाली. शीतलने शरद आणि स्नेहाच्या मदतीने मालाड येथील एका जणांकडून दोन लाख रुपये घेऊन मूल दिल्याचे समजले. पोलीस मालाड येथे गेले. तेथून त्या मुलाची सुटका केली.
डॉ. खंदारेचे दिवा येथे दवाखाना आहे. वंदना ही उपचारासाठी खंदारेकडे जात असायची. काही दिवसापूर्वी वंदना ही खंदारे यांच्याकडे आली. तिने खंदारे याना मुलांबाबत चौकशी केली. तेव्हा त्याने तिला शीतलची माहिती दिली. एजंट म्हणून काम करणारे हे रुग्णालयात येणार्यांची आर्थिक परिस्थितीची माहिती घेत असायचे. सरोगसीसाठी महिलांना पैशाचे आमिष दिले जाते. या टोळीने आता पर्यंत 14 मुलाची तस्करी केली आहे. तेलंगणा राज्यात नवजात बालकाची मागणी आहे. या टोळीने बहुतांश मुलांना तेलंगणा येथे विक्री केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या सहा जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याना पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोड वर्डचा वापर
अटक आरोपी हे व्हाट्सच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून ते मुलगा असल्याचे एम आणि मुलगी असल्यास एफ अशा कोडवर्डचा वापर करत असायचे. तसेच ते मुलाचे फोटो पाठवत असायचे.
ठाण्यातील दोन रुग्णालये रडारवर
डॉ. खंदारेचे दिवा येथे क्लिनिक आहे. ज्या महिला सरोगसीसाठी इच्छुक आहेत, अशाना ठाण्यातील दोन रुग्णालयात नेले जायचे. तेथे त्याची तपासणी केली जायची. त्यामुळे ठाण्यातील दोन रुग्णालये ही पोलिसांच्या रडारवर आहेत. तर सरोगसी प्रकरणात अटक केलेल्या एका महिलेला फक्त दहा हजार रुपयेच मिळाले होते. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने तिने सरोगसीचा निर्णय घेतला.