
करंबेळे तर्फे देवळे येथे दुकानाला आग; पावणेचार लाखांचे नुकसान
संगमेश्वर : करंबेळे तर्फे देवळे येथे दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये किराणा माल आणि जनरल स्टोअर्सचे मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे तर्फे देवळे येथे घडली. त्यात दुकान जळून खाक झाले असून, ३ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कनकाडी येथे राहणारे तानाजी सखाराम गार्डी यांचे करंबेळे तर्फे देवळे येथे किराणा माल आणि जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. सोमवारी रात्री दुकान बंद करून ते कनकाडी येथील घरी गेले. मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास या दुकानाला अचानक आग लागली. हे लक्षात येताच ग्रामस्थांनी या घटनेची माहिती गार्डी यांना दिली. त्यांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेतली व ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत आगीने संपूर्ण दुकानाला वेढा घातला व आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले.
तलाठी राम खडके यांनी मंगळवारी सकाळी पंचनामा केला. दुकानातील फ्रीज व सर्व साहित्य जळून ३ लाख ७५ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. यावेळी उपसरपंच, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. ही आग कशामुळे लागली, याचे कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.