
वेश्या व्यवसाय प्रकरणात दोघांनाही न्यायालयीन कोठडी
चिपळूण:कोणत्या ना कोणत्या कारणातून फिरायला जात अल्पवयीन भाचीला चुलत मामीने वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याचा खळबळजनक प्रकार चिपळुणात उघडकीस आला. या प्रकरणी त्या मामीसह एका तरुणाला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांची पोलिस कोठडी संपताच त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पीडित अल्पवयीन भाचीला वेगवेगळी आमिषे दाखवून तिची मामी तिच्याबरोबर चिपळूण, रत्नागिरी, खेड, लोणावळा येथे फिरायला जात असे. यावेळी ती मामी त्या भाचीला चक्क वेश्या व्यवसायास प्रवृत्त करत असे. पीडित अल्पवयीन तरुणी पोलिस स्थानकात आल्यानंतर हा प्रकार पुढे आला होता. याप्रकरणी त्या चुलत मामीसह खेड तालुक्यातील अभिजित पांडुरंग पवार या तरुणाला अटक केली आहे. शुक्रवारी त्या दोघांची पोलिस कोठडी संपताच त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.