
डिझेल परताव्याचे ४६ कोटी नौका मालकांच्या खात्यात वर्ग
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १ हजार ३५० मासेमारी नौका मालकांना वर्षभरात ४६ कोटी रुपयांचे डिझेल परतावा अनुदान वितरित करण्यात आले. उर्वरित नौका मालकांना १४ कोटी रुपये कोषागार कार्यालयाकडून सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून दिले जाणार आहेत. हा १४ कोटी रुपयांचा धनादेश वटून मत्स्यव्यवसाय विभागाकडे रकम प्राप्त झाल्यानंतर परतावा वाटप केले जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि.मी. चा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्रात जिल्ह्यातील २ हजार ५२० नौकांकडून मासेमारी केली जाते. त्याचबरोबर जिल्ह्यात ८५ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था असून, या संस्थांचे सुमारे ४१ हजार नौका सदस्य आहेत. या सहकारी संस्थांपैकी २८ सहकारी संस्था डिझेल परतावा अनुदानाच्या यादीत आहेत. डिझेल परताव्याच्या यादीत असलेल्या २८ सहकारी संस्थांमधील सुमारे १४७३ सदस्य नौका परताव्यासाठी पात्र आहेत. गेल्या वर्षभरात म्हणजे सन २०२३-२४ मध्ये सुमारे ६० कोटी रुपयांचे डिझेल परतावा अनुदान प्राप्त झाले. अनुदानाचे धनादेश कोषागार कार्यालयाकडे दिल्यानंतर ती रक्कम आहे. सहाय्यक मत्स्यव्यवसाय कार्यालयाला मिळते. येथून ती रक्कम निकषानुसार नौका मालकांच्या खात्यात जमा होते. डिबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम वर्ग होत असते. जे ४६ कोटी रुपये मिळाले ती रक्कम डिझेल परताव्यासाठी पात्र असणाऱ्या नौका मालकांच्या खात्यात वर्ग झाली.