
संगमेश्वरात विजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस
संगमेश्वर : तालुक्यातील काही गावांत शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता वाटत होती. अचानक पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली.
गेले काही दिवस उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. तप्त उष्णतेने नागरिक कमालीचे बेजार झाले आहेत. दरम्यान गेले दोन दिवस अधूनमधून ढगाळ वातावरणही दिसून येत होते. त्यामुळे अवकाळी केव्हाही हजेरी लावणार हे निश्चित असतानाच आज (शनिवार) दुपारच्या दरम्याने संगमेश्वर तसेच लोवले, बुरंबी, माभळे, असुर्डे, आदी गावांत काही ठिकाणी अवकाळी पावसाने हलक्या सरीने तर काही गावांत विजांच्या लखलखाठ अशी आताषबाजी करत व कानठळ्या बसणाऱ्या गडगडाटासह जोरदार वाऱ्याने तासभर धुमशान घातले.
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सर्व ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. दुचाकीवरून प्रवासा करणाऱ्यांची तर रेनकोट वा छत्री नसल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभ्या करून झाडांचा वा टपऱ्यांचा आधार घेण्याची वेळ आली. तर याचा फटका रत्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना चांगलाच बसला.
गेले काही दिवस सातत्याने बदलत असलेल्या वातावारणामुळे शेतकरी तसेच बागायतदार चिंताग्रस्त असताना अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आंबा तसेच काजू पिकावर याचा परिणाम होण्याची भीती असून तसेच झाल्यास शेतकऱ्यांना व बागायतदारांना आर्थिक नुकसानीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.