
महिलेशी गैरवर्तन प्रकरणात चौघांना अटक, जामीन
चिपळूण : महिलेशी गैरवर्तन केल्याने याविषयी जाब विचारण्यासाठी गेलेल्या त्या महिलेसह तिच्या कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली होती. या प्रकरणी अलोरे- शिरगाव पोलिसांनी चौघांना अटक केली होतीं. सोमवारी त्या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्याना जामीन मंजूर झाला आहे.
संदीप भिकू शिर्के, संतोष भिकू शिर्के, विशाल रविंद्र निचोरे, अनिल सीताराम शिर्के (सर्व-मुंढे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पीडित महिला तिच्या घरी असताना संदीप शिर्के हा येथे आला व त्याने त्या महिलेला अपशब्द बोलून तिच्याशी गैरवर्तन केले. महिलेने केलेल्या आरडाओरड्यानंतर संदीप शिर्के पळून गेला. या प्रकरणी संदीपला जाब विचारण्यासाठी पीडित महिला व तिचे कुटुंबिय गेले असताना त्याचे घर बंद होते. त्यामुळे ते पुन्हा माघारी परतत असताना एका बसथांब्यानजीक वरील चौघांनी पीडित महिलेच्या कुटुंबाला मारहाण केली. यातील संतोष शिर्के याने त्या महिलेला दगड मारल्याने यात महिला जखमी झाली होती. या प्रकरणी पीडित महिलेने अलोरे-शिरगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.