
मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा शोध सुरु
चिपळूण : शिमगोत्सवासाठी आलेल्या योगिनी पालकर एका वयोवृध्द महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र दोघा अज्ञात चोरट्यांनी खेचून पलायन केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी त्या चोरट्याचा शोध सुरु केला आहे. यासाठी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजचा आधार घेतला जात आहे. दरम्यान हे चोरटे सराईत असल्याचे पोलिसांकडून बोलले जात आहे. पालकर या भोगाळे मार्गावरील कलावती मंदिरातील दर्शनानंतर त्या याच परिसरात असलेल्या रजनीगंधा हॉटेलमध्ये जात होत्या. या दरम्यान एसटी बसस्थानकाकडून दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने पालकर यांच्या गळ्यातील १ लाख ८० हजार किंमतीचे साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र खेचून ते चोरटे भरधाव वेगाने दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेनंतर चोरट्याच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यानुसार त्यांनी या चोरट्याचा शोध सुरु केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या चोरट्यांनी अन्य ठिकाणीही या पध्दतीच्या चोऱ्या केल्या असून ते सराईत असल्याचे बोलले जात आहे.