
आराम बसवर वडाचे झाड कोसळून नुकसान
लांजा:- शिमगोत्सवासाठी आणलेली खासगी आराम बस सावलीत उभी करून ठेवली असता त्यावर जुनाट वडाचे झाड कोसळून नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी २:४५ वाजता गोविळ (ता. लांजा) येथील मारुती मंदिर स्टॉप येथे घडली. सुदैवाने या गाडीतील चालक बालंबाल वाचला. मात्र, आराम बसचे मोठे नुकसान झाले.
शिमगोत्सवासाठी गावातील मुंबईकर खासगी आराम बस (एमएच ०३, सीव्ही ७९५२) घेऊन शुक्रवारी गावी आले आहेत. ही गाडी गोविळ गावातील मारुती मंदिर बसथांबा येथे वडाच्या झाडाखाली सावलीत उभी करुन ठेवण्यात आली होती. या गाडी चालक आराम करत होते. दुपारी २:४५ वाजण्याच्या दरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेले भलेमोठे जुनाट वडाचे झाड आराम बसवर उन्मळून कोसळले. या गाडीच्या काचा तुटल्या असून, बसचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने हे झाड मागील बाजूला पडल्याने गाडीतील चालक बचावले. वडाचे झाड वाटूळ दाभोळे अर्धा रस्त्यावर पडल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती.