
गांधील माश्यांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू
दापोली :तालुक्यातील आगरवांयगणी गावामध्ये गांधील माश्यांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत दापोली पोलिसांनी माहिती दिली आहे. दापोली तालुक्यातील आगरवांयगणी येथील माधव पुरुषोत्तम सहस्त्रबुद्धे (वय ७५) यांच्यावर १४ मार्चला गांधीलमाशांनी हल्ला केला होता.
जखमी झालेल्या सहस्त्रबुद्धे यांना उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र १६ मार्चला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून ही नोंद दाभोळ सागरी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.