
गौरव लवेकरकडे ८०० शिवकालीन नाण्यांचा संग्रह
राज्य सरकारच्या पुस्तकात चार नाण्यांची छायाचित्रे प्रसिद्ध
चिपळूण : शिवकालीन नाणी संग्रहाचा छंद जोपासणाऱ्या शहरातील खंड येथील गौरव शेखर लवेकर याने गेल्या १० वर्षांच्या कालावधीत सुमारे ८०० शिवकालीन नाण्यांचा संग्रह केला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रवास करून त्याने या नाण्यांचा शोध घेत संग्रहित केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्यभिषेकास साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याने महाराष्ट्र सरकारने मराठा साम्राजाचे चलन या कॉफीटेबल बुकची निर्मिती केली. यात गौरवकडील नाण्यांचाही समावेश आहे.
गौरव शेखर लवेकर यांचे आजोबा प्रसिद्ध मूर्तिकार. त्यांच्या पश्चात शेखर लवेकर हे सुवर्णालंकाराचा व्यवसाय सांभाळत आहेत. त्यामुळे सोन्या चांदीच्या घडणावळीमुळे लवेकर कुटुंबीयांच्या घरी विविध प्रकारची नाणी यायची. यातूनच गौरवला नाणी संग्रहाची आवड निर्माण झाली. यातूनच त्याने २०१४ पासून महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच नाणी संग्रह करण्यास सुरुवात केली. शिवकालीन, ब्रिटिश, मुघल, तसेच संस्थानिकांची नाणीही त्याने संग्रहित केली आहेत. शिवकालीन नाणी संग्रह करण्याचा त्याला फार आवड आहे. यासाठी गेली १० वर्षाच्या कालावधीत पंढरपूर, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी प्रवास केला. मुंबई कॉइन सोसायटीचा तो अध्यक्ष आहे. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवराई नाण्यांची निर्मिती झाली. या कालावधीतील अनेक नाणी त्याने संग्रहित केलेली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषकेला ३५० वर्षे पूर्ण झाली. शिवाय देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाकडून मराठा साम्राज्याचे चलन या कॉफीटेबल बुकची निर्मिती करण्यात आली. यातून शिवकालीन नाण्यांची माहिती लोकांना देण्यात आली. दिल्ली येथे लाल किल्ल्यात दिवाणीखाणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले.
या पुस्तकासाठी राज्यभरातून नामवंत तज्ज्ञ आणि नाणी संग्रहकांनी नाणी पाठवली होती. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातील दर्शिनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव लेखक, डॉ. दिलीप बलसेकर यांनी राज्यभरातील नाणी संग्रहकांकडून नाण्यांची छायाचित्रे जमवली. यात गौरवने संकलित केलेल्या नाण्यांचे छायाचित्रही समाविष्ट झाल्याने त्यांचे शहरपरिसरातून विशेष कौतुक केले जात आहे.
गौरवचा खजिना
दुदांडी शिवराई, बिंदुमय रायगडी शिवराई (डॉटेड), हाफ डॉटेड शिवराई, तंजावर शिवराई, लेटर शिवराई आदींचा यात समावेश आहे. १८३० नंतरच्या ब्रिटिश काळातील नाण्यांचाही संग्रह त्याने केला आहे.