
शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा
रत्नागिरी : खेड तालुक्यातील भिलारे आयनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना सोमवार ४ मार्च रोजी दुपारी २ वा. घडली आहे. सुनिल कुमार राजाराम शिंदे (वय ४२) आणि राजेंद्र यशवंत भिलारे (४०) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात ग्रामसेवक राहुल राजेंद्र चौधरी यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, सोमवार ४ मार्च रोजी भिलारे आयनी ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी दोन्ही संशयितांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि फिर्यादी ग्रामसेवक राहुल चौधरी यांच्यशी वादा घातला. त्यानंतर ग्रामसभेतून उठून फिर्यादीच्या अंगावर धावत जाऊन तसेच उपसरपंचांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी दोन्ही संशयितांवर भादंवि कायदा कलम ३३२,३५२,३५३,३२३,५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.