
राज्यस्तरीय महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराने डॉ. तोरल शिंदे यांचा सन्मान
रत्नागिरी :जागतीक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 3 मार्च रोजी महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स,हर घर रोजगार व टाइम्स ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने रत्नागिरी मध्ये प्रथमच कला, क्रीडा, औद्योगिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीस प्रतिभावंत महिलांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे “वूमन अचिवर्स अवॉर्ड” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरी आणि कोकणामध्ये वंध्यत्वावर काम करणाऱ्या तसेच इंडियन मेडिकल असोसिअशनच्या रत्नागिरीच्या अध्यक्षा डॉ. तोरल निलेश शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अध्यक्ष आदम सय्यद, सेक्रेटरी स्नेहा कुलकर्णी, उपाध्यक्ष सतीश राठोड, कार्याध्यक्ष महेबुब सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. तोरल शिंदे यांनी स्त्रीरोग तज्ञ म्हणून रत्नागिरीमध्ये काम करत असताना येथील महिलांमधील वंध्यत्वाच्या समस्येबद्दल त्यांना जाणीव झाली. या विषयावर अधिक अभ्यास करून टेस्ट ट्यूब बेबी ही उपचार पद्धती त्यांनी आत्मसात करून कोकणातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी सेंटर २०१४ मध्ये रत्नागिरीत सुरु केले. गेल्या 9 वर्षात या सेंटरमुळे वंध्यत्वाशि झगडणाऱ्या महिलांना आई होण्याचा मार्ग मिळाला. डॉ. शिंदे यांचे समुपदेशन आणि योग्य उपचार पद्धती यामुळे अनेक दाम्पत्यांना आई बाबा होण्याचा आनंद त्या देऊ शकल्या. तर इंडियन मेडिकल असोसिअशनच्या रत्नागिरीच्या अध्यक्षा म्हणून डॉ. तोरल शिंदे यांनी रुग्ण, डॉक्टर यांच्यासह रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका, कर्मचारी यांच्यासाठी विशेष शिबिरांचे, उपक्रमांचे आयोजन केले होते.
त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स,हर घर रोजगार व टाइम्स ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने “वूमन अचिवर्स अवॉर्ड” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास दैनिक रत्नागिरी टाईम्स आणि गोवा टाइम्सच्या उर्मिला ताई घोसाळकर, कांचन मालगुंडकर, जेष्ठ उद्योजक केशवराव इंदुलकर, राहुल पंडित, सतीशराव साळवी, युवा उद्योजक सचिन देसाई यांची विशेष उपस्थिती लाभली. या पुरस्काराबद्दल डॉ. शिंदे यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.