
गणेशगुळे समुद्रकिनारी अज्ञाताचा मृतदेह
रत्नागिरी:तालुक्यातील गणेशगुळे येथील समुद्रकिनारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, याचा शोध पूर्णगड सागरी पोलिस स्थानकाचे पोलिस घेत आहेत.
हा प्रकार सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान समोर आला. गणेशगुळे येथील समुद्रकिनारी काही ग्रामस्थांना हा मृतदेह पडल्याचे दिसले. त्यांनी याबाबत पोलिस पाटील यांना माहिती देताच त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पूर्णगड सागरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
या मृतदेहाची ओळख पटलेली नसून, हा मृतदेह पुरुषाचा आहे. त्याचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मुत्यू म्हणून नोंद केली आहे.