
धमकी प्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी
खेड :आक्षेपार्ह छायाचित्र पाठवून व्हायरल करण्याच्या धमकीद्वारे ३० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मेहजर अली इकबाल हुसैन (फतेहपूर- राजस्थान) यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला १२ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरातील एका व्यक्तीस संशयिताने व्हॉटस्ॲप व्हॉईस कॉल करून आक्षेपार्ह फोटो त्याच्या मित्रांना पाठवणार असल्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तसे न करण्यासाठी त्याने ३० हजार रुपये ऑनलाईन पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार संशयितावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तपासाला गती दिली. त्यानुसार पथकाच्या साहाय्याने राजस्थान येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने अन्य कोणास धमकी देऊन फसवणूक केली आहे का? याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.