
मुंबईतील दांपत्याची ५० हजारांची ऑनलाईन फसवणूक
दापोली: दापोली येथे मुलाच्या औषध उपचारासाठी आले असताना अज्ञात भामट्याकडून अंधेरी येथील शैलेंद्र व्यंकट रमण राजा या ६७ वर्षीय व्यावसायिकाची ५० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. याची नोंद उशिराने दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र राजा हे आपली पत्नी कोमलादेवी सोबत मुलगा ऋषी कुमार याच्या उपचारासाठी दापोली येथे आले होते. राजा यांचा औषध कंपनीची मशीन बनवून विक्री करण्याचा व्यवसाय आहे. २२ फेब्रुवारी रोजी रात्री दापोली येथे रात्री ८.३० च्या सुमारास त्यांना अज्ञात इसमाचा फोन आला व त्याने मला कंपनीचा ‘वॉ ल” बनवून द्याल का, असे विचारले. राजा यांच्या व्हॉट्सअॅपवर एक फोटो
पाठवला तो पाहून राजा यांनी बनवून देण्याचे कबूल केले. त्यावर अज्ञात इसमाने मला ८० नग हवे आहेत, असे सांगितले. त्यासाठी तुम्हाला पेटीएमवरून आगाऊ पेमेंट करतो, असे सांगितले. त्यावर राजा यांनी माझ्याकडे पेटीएम नाही. माझी पत्नी कॉमलादेवी हिचे पेटीएम असल्याचे कळवले. त्यानंतर त्या अज्ञात इसमाने आपल्या फोनवरून एक क्यूआर कोड पाठवला. व त्यावर टच करून पैसे काढून घ्या, असे सांगितले. तसे केल्यानंतर एक रुपया राजा यांच्या खात्यात जमा झाला. त्यावर विश्वास ठेवून त्यानंतर अज्ञात इसमाने पुन्हा ४९,९९९ रुपयांचा क्यूआर कोड पाठवला. राजा यांनी तो ओपन करून त्यावर पत्नीच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकला. ओटीपी टाकताच पत्नीच्या खात्यातून ४९ हजार ९९९ रुपये गेल्याचा मेसेज आला. या बाबत राजा यांनी आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर अज्ञात इसमाविरोधात दापोली पोलीस स्थानकात उशिराने फिर्याद दिली. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करीत आहेत.