
शहरातील काँक्रिटीकरण १५ ऑगस्टपर्यंत होणार पूर्ण
रत्नागिरी, : शहरात सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी काही ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असून ती कामे १५ मेपर्यंत पूर्ण होणार आहेत, अशी माहिती पालिकेचे बांधकाम विभागाचे अभियंता यतीराज जाधव यांनी सांगितले.
रत्नागिरी शहरात काँक्रिटच्या ४ मार्गिकांच्या रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे. ९६ कोटी रुपये खर्च करून साळवी स्टॉप ते मारूती मंदिर आणि मारूती मंदिर ते नाचणे मार्गातील रस्त्याच्या एका मार्गिकचे काम अंतिम टप्प्यात आहे. १५ ऑगस्टपर्यंत काँक्रिटचे रस्ते पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे पालिकेचे बांधकाम विभागाचे अभियंता यतीराज जाधव यांनी सांगितले. साळवी स्टॉप ते दांडाफिशरीज अशा मुख्य मार्गाच्या काँक्रिटीकरणाचा समावेश आहे. त्यानंतर नाचणे रोड, मजगाव रोड, थिबापॅलेस आदींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात साळवी स्टॉपपासून मारूती मंदिरापर्यंत हे काम आले आहे तसेच नाचणे रोडची एक मार्गिका पूर्ण होत आली आहे. डांबरीकरणाने रस्त्याची समान पातळी करून काँक्रिटीकरण केले जात आहे. डांबरीकरण सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत आले आहे. त्यावर काँक्रिटीकरण होणार आहे. शहरातील काही रस्ते खराब झाले होते. या रस्त्यांचे डांबरीकरण केले जात आहे. हे डांबरीकरणाचे काम १५ मे पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी व्यक्त केला.