
हेदलीतील वणव्यात झाडे जळून खाक
खेड: तालुक्यातील हेदली-काणेकर मोहल्ला येथे गुरूवारी दुपारी १.३० च्या सुमारास अचानक लागलेल्या वणव्यात झाडे जळून खाक झाली. येथील नगर परिषदेच्या अग्निशमक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
हेदली-काणेकर मोहल्ला येथे वणवा लागल्याचे नजीकच्या ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच तातडीने घटनास्थळी पोहोचले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने ग्रामस्थांनी नगर परिषदेच्या अग्निशमक केंद्रास कळवले. त्यानुसार केंद्रातील फायरमन दीपक देवळेकर, शाम देवळेकर, जयेश पवार, प्रणय रसाळ, वाहनचालक गजानन जाधव, प्रणय घाग आदी तातडीने घटनास्थळी पोहचले. अथक प्रयत्नानंतर वणवा आटोक्यात आणल्याने नजीकच्या घरांसह गोठ्यांना पोहचणारा धोका टळताच ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.