डॉ. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राचाएमआयडीसी सोबत सामंजस्य करार
रत्नागिरी : कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या (रामटेक) येथील महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राने एमआयडीसीसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार उद्योग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी योगाभ्यासाचे धडे देण्यात येणार आहेत. या करारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले व पुढाकार घेतला.
राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी योगाभ्यास हा शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांनी योगाभ्यास करावा, असे आवाहन करत कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्याकडे सर्व कर्मचाऱ्यांसाठी रत्नागिरी उपकेंद्राद्वारे योग प्रशिक्षण उपक्रम राबविण्याबाबत आग्रह केला होता. या उपक्रमाची सुरवात रत्नागिरी एमआयडीसीमधून व्हावी, असे निर्देशही त्यांनी दिले. या निर्देशानुसार डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र उपकेंद्र आणि एमआयडीसी रत्नागिरी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या पुढे उपकेंद्राद्वारे रत्नागिरी एमआयडीसीमध्ये योग प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. तसेच दोन्ही संस्थांच्या समन्वयाने समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत.
या प्रसंगी रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, एमआयडीसी रत्नागिरीच्या प्रादेशिक अधिकारी सौ. वंदना मांडगे, सामंजस्य करार समन्वयक सागर पवार, क्षेत्राधिकारी, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, रत्नागिरी उपकेंद्राचे सहायक प्राध्यापक अविनाश चव्हाण, उपकेंद्र कार्यालय प्रतिनिधी प्रथमेश घोसाळे उपस्थित होते.