
पोलिस, आरपीएफचे रेल्वे सुरक्षेवर लक्ष
आयजी संजय दराडे; उपाययोजनांच्या अंमलबजावणीच्या सूचना
रत्नागिरी, : कोकण रेल्वेच्या सुरक्षेवर पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलामार्फत विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्या अनुषंगाने आरपीएफ आणि पोलिसांचा समन्वय, मानवनिर्मित आपत्ती ओळखणे, रेल्वे मालमत्तेचे नुकसान रोखणे, रेल्वे गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, रेल्वे क्रॉसिंगवर योग्य नजर ठेवणे, योग्य बळाचा वापर करून पेट्रोलिंग करणे, संयुक्त मॉक ड्रिल आयोजित करणे याबाबत चर्चा करून त्यावर अंमल करण्याच्या सूचना कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी दिल्या.
येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात कोकण रेल्वेची सुरक्षा व उपाययोजना या विषयावर बैठक झाली. कोकण परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. पोलिस मुख्यालय व जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना भेटी दिल्या व या भेटी दरम्यान पोलिस ठाण्यांमधील सर्व अभिलेख, सर्व प्रकारचे रजिस्टर, मुद्देमाल, शस्त्रागार, प्रलंबित अर्ज यांचा आढावा घेतला. पोलिस अंमलदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दरबार भरवण्यात आला.
त्यानंतर दराडे यांनी अधीक्षक कार्यालयात कोकण रेल्वेची सुरक्षा व उपाययोजनेवर बैठक घेतली. बैठकीसाठी अंजनीकुमार सिन्हा, फ्रान्सिस लोबो, सोमनाथ घार्गे, सौरभ अग्रवाल, जयश्री गायकवाड आदी उपस्थित होते. बैठकीला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारीही दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते तसेच भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
