
मिर्या समुद्रकिनारी आढळला महाकाय मृत व्हेल
रत्नागिरी:- शहरानजिकच्या मिर्या किनार्यावर भलामोठा 45 फुट लांबीचा व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. गेल्या दहा दिवसांपूर्वी हा व्हेल मासा मृत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून तो किनार्यावर कुजलेल्या अवस्थेत होता. रत्नागिरीच्या किनारी भागात गेल्या चार महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
नोव्हेंबरमध्ये गणपतीपुळेच्या समुद्र किनार्यावर व्हेल माशाचे पिल्लू पाण्याच्या लाटांबरोबर येऊन अडकला होते. रत्नागिरी वन विभागाकडून त्याला जीवदान देण्याचं प्रयत्न सुरू होते. व्हेल माश्याच्या त्या पिल्लाला रेस्क्यू करण्यात यश आलेलं होतं. समुद्रात त्याला सोडून दिल्यानंतर ते सुखरूप राहिल असे सर्वांनाच वाटले होते. मात्र दुर्दैवानं या व्हेल माश्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला होता. त्या रेस्क्यूच्या दोन दिवसात जवळपास पाच वेळा या पिल्लाला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र 48 तासांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्याचा मृत्यू झाला आणि तो पुन्हा समुद्र किनारी आल्याने किनार्यावरच त्याचे दफन करण्यात आले होते.
या घटनेनंतर सुमारे चार महिन्यांनी आता मिर्या किनार्यावर आणखीन एक 45 फुटी लांबीचा व्हेल मासा मृतावस्थेत मिळून आला मंगळवारी सायंकाळी परिसरातील नागरिकांच्या तो निदर्शनास आला. त्याविषयीची खबर वनविभागाला देण्यात आली. वनविभाग, कांदळवन आणि अभ्यासकांना या घटनेची खबर मिळताच बुधवारी विभागांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या मृतावस्थेतील माशाचा पंचनामा करण्यात आला. हा मासा सुमारे 10 दिवसांपूर्वी मृत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सायंकाळी त्या माशाला किनार्यावर दफन करण्यासाठी जेसीबी मागवून कार्यवाही करण्यात वनविभागाची यंत्रणा गुंतली होती.