
कारने केला चार दुचाकींचा चुराडा; चौघे जखमी, तीन तास वाहतूक ठप्प
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील नाचणे मार्गावर कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने चार दुचाकींचा चुराडा केला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कार चालक दर्शन जैन हाही या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
रत्नागिरी शहरातील दर्शन जैन हा आपल्या ताब्यातील इलेक्ट्रिक कार घेऊन मारुती मंदिर येथून नाचण्याच्या दिशेने जात होता. पॉवर हाऊस येथे आल्यानंतर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर त्याने एका मागोमाग एक अशा चार दुचाकींना धडक दिली. त्यानंतर कार इलेक्ट्रिकच्या खांबावर आदळून थांबली. या अपघातात सचिन धुळप (रा. गोळप), प्रसाद शिवगण, सुभाष काटकर (रा. पावर हाऊस), गणपत धाडवे (रा. पाथरट) हे जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांसह शहर पोलिसा स्थानकाचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केल्यानंतर अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आली. या अपघातामुळे सुमारे तीन तास नाचणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रात्री आठ वाजता येथील वाहतूक सुरळीत करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे.
