
डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करण्यासाठी लांजा नपवर मोर्चा
लांजा: नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी, डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा देत लांजा नगरपंचायत परिसर दणाणून सोडण्यात आला. निमित्त होते ते सोमवारी ५ फेब्रुवारी दुपारी बारा वाजता कोत्रेवाडी ग्रामस्थांनी डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द होण्यासाठी नगरपंचायतीवर छेडलेल्या आंदोलनाचे
लांजा नगरपंचायतीमार्फत कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र हा प्रकल्प लोकवस्ती पासून अवघ्या ८० मीटर अंतरावर असल्याने येथील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला असून या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तरीही नगरपंचायत प्रशासनाकडून गेल्या साडेतीन वर्षांपासून कोत्रेवाडी येथील प्रकल्प प्रस्तावित जागा रद्द केलेली नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर कोत्रेवाडी ग्रामस्थांनी आज सोमवारी पाच फेब्रुवारी रोजी भाजपाचे माजी आमदार आणि लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर धडक मोर्चा दिला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर ,शहराध्यक्ष गुरुप्रसाद प्रसाद तेली, नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर, शितल सावंत, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना खामकर
तालुका सरचिटणीस शैलेश खामकर, विराज हरमले
जिल्हा सरचिटणीस हेमंत शेट्ये तसेच तालुका पदाधिकारी विजय कुरूप, माजी शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, नाना शेट्ये ,उपशाराध्यक्ष सतीश पेडणेकर, सुयोग तोडकरी आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील भाजपा कार्यालयापासून ते नगरपंचायतीपर्यंत जोरदार घोषणाबाजी करीत सर्व ग्रामस्थ नगरपंचायत धडकले .त्यानंतर मुख्याधिकारी दालनात बाळासाहेब माने आणि नगरसेवक संजय यादव व अन्य पदाधिकारी यांनी चर्चा केली. त्यानंतर लांजा नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये ग्रामस्थ आणि मुख्याधिकारी व भाजपा पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी ग्रामस्थांनी आपली बाजू मांडली. साडेतीन वर्षे एकाच जागेवर नगरपंचायत का अडून बसली आहे? त्याचप्रमाणे जिल्हा समितीने नाकारलेल्या प्रस्तावापैकी एक असलेला कोत्रेवाडी येथील प्रस्ताव डम्पिंगसाठी नगरपंचायत प्रशासनाने कसा काय स्वीकारला? तसेच विविध प्रश्नांची सरबत्ती केली. नगरसेवक संजय यादव यांनी सांगितले की, कोत्रेवाडी येथे कचरा टाकण्यासाठी गाड्या गेल्या तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे प्रशासनाने आपल्या भूमिकेत बदल करावा.
यावेळी बाळासाहेब माने यांनी मुख्याधिकारी हर्षला राणे यांना सांगितले की, तुम्ही तुमच्या स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे लोकांची बाजू मांडा. तुम्हाला आमच्या कडून सहकार्य हवे असेल ते देवू . मात्र सदर प्रकल्पाची जागा रद्द करा.यानंतर लोकांची बाजू समजावून घेतल्यानंतर मुख्याधिकारी हर्षला राणे आणि सांगितले की आपण या संदर्भात माहिती घेतो त्याचप्रमाणे नगरपंचायतीचे काम हे नियमानुसारच होईल. त्याच कोठेही लोकहिताला बाधा येईल असे कृती होउ देणार नाही. त्याचप्रमाणे कुवे येथे सध्या कचरा टाकला जात आहे ती जागा शासनाच्या मालकीची असल्याने ती जागा डंपिंग ग्राउंड साठी प्रस्तावित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले .त्यावेळी कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी कोत्रेवाडी येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.