
खवले मांजर तस्करीप्रकरणी एकास जामीन मंजूर
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील काळकाई मंदिरासमोर खवले मांजर तस्करीप्रकरणात सहभाग असलेल्या अनिल धोंडिराम जाधव (नागाव-महाड, जि. रायगड) यास येथील प्रथम वर्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने अॅड. स्वरूप थरवळ यांनी काम पाहिले. खवले मांजर तस्करीप्रकरणी वनविभागाच्या पथकाने आतिश सोनावणे (रा. तुळशी बुद्रुक- बौद्धवाडी) याच्या मुसक्या आवळल्या होत्या. सखोल चौकशीअंती अनिल धोंडिराम जाधव व राजेंद्र रघुनाथ मोरे या
दोघांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तुळशी- खिंडीजवळ दोघांनाही जेरबंद करण्यात आले होते. तिघांची एकदिवसाची वन कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता आतिश सोनावणे व अनिल जाधव यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तर राजेंद्र मोरे यास एकदिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यातील अनिल जाधव याच्या वतीने अॅड. स्वरूप थरवळ यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत संशयितास काही अटी व शर्थीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला.