
नारळ काढण्यावरुन मारहाण ; वृद्ध जखमी
रत्नागिरी ः तुम्ही तुमच्या माडाचे नारळ काढा… असे बोलल्याच्या रागातून डोक्यात दगड मारुन जखमी झालेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकाश काशिनाथ विलणकर (वय ६० रा. खडपेवठार, रत्नागिरी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ३१) सकाळी साडेनऊच्या सुमारास येथील खडपेवठार येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश विलणकर यांची खडपेवठार येथे सामाईक नारळाची बाग आहे. या बागेत राजन विलणकर, सुरज कदम, गणेश गोडसे हे नारळ काढत होते. त्यावेळी प्रकाश यांनी तुम्ही तुमच्या माडाचे नारळ काढा असे सांगितले. याचा राग मनात धरुन संशयितांनी शिवीगाळ करुन मारहाण केली तर संशयित सुरज कदम यांनी प्रकाश विलणकर यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.