
दहा तोळे सोने असलेली हरवलेली पर्स पोलीसांकडून व्यापाऱ्याच्या स्वाधिन
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर परिसरात राहणारे मनीष कांतीलाल जैन यांची पर्स हरवली होती. पर्समध्ये दहा तोळे सोने आणि दुकानाच्या चाव्या होत्या. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही पर्स उचलणाऱ्या इसमाचा शोध घेऊन ती पर्स जैन यांना परत केली.
मनीष कांतीलाल जैन हे आपल्या नाकोडा ज्वेलर्स हे दुकान उघडण्यासाठी घरातून निघाले त्यावेळी त्यांच्या हातामध्ये असणाऱ्या पर्समध्ये दुकानाच्या चाव्या व सुमारे दहा तोळे सोने (मंगळसूत्र व बांगड्या) असे कुठेतरी गहाळ झाले म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली होती.
ही तक्रार प्राप्त होताच शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश तोरस्कार यांनी पोना/1447 पंकज पडेलकर यांना सदर पर्सचा शोध घेणे कामी पाचारण करण्यात आले. पोना पंकज पडेलकर यांनी शहरांमधील असणाऱ्या सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले असता सदरची पर्स उचलणारे इसम विशाल विठ्ठल मालवदे, राहणार कोळंबे यांची चौकशी करुन हरवलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करुन ही पर्स मधील चाव्या व सर्व दागिने मनीष कांतीलाल जैन यांना पोलीस निरीक्षक महेश तोरस्कार यांच्या हस्ते रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे सुखरूप ताब्यात देण्यात आले आहेत.