
प्रत्येक नागरिकांनी जबाबदारी ओळखून कार्य केले पाहिजे : माजी सैनिक रामचंद्र सावंत
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
रत्नागिरी : भारत देशाचा अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना भारतातील प्रत्येक नागरिकांने आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना प्रत्येक नागरिकांनी आपापली जबाबदारी ओळखून देशहितासाठी कार्य केले पाहिजे अशी अपेक्षा माजी सैनिक रामचंद्र सावंत यांनी व्यक्त केले.
ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेत भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बालसभेच्या वेळी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, भारतामध्ये असलेल्या प्रत्येकाने विविध राष्ट्रपुरुषांचे कार्य स्मरून देशसेवा करण्यासाठी दिवसातील थोडा तरी वेळ दिला पाहिजे. तरच आपला देश हा महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू राहील. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि अन्य राष्ट्रीय सण सुट्टी म्हणून साजरा न करता प्रत्येकाने स्वतःहून अशा उपक्रमात सहभागी झाले पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी सर्वप्रथम भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सौ. रेणुका प्रभाकर धोपट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. स्वाती महेंद्र धनावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बालसभा संपन्न झाली. यावेळी विद्यार्थ्यांपैकी करण धनावडे, सृष्टी तांबटकर, मनस्वी धनावडे, विराज आलीम, पियुष कुर्टे, अर्णव धनावडे, गौरव तांबटकर, अबोली धनावडे, प्रणव धनावडे, मयुरेश कुर्टे, तेजस धनावडे, देवश्री तांबटकर, अस्मि धनावडे, स्वरा धनावडे, आर्यन तांबटकर, गौरी धनावडे, राज धनावडे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मनोगते व्यक्त करत प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगितली. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपात देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच उपस्थितापैकी सुवर्णा धनावडे, मनस्वी तांबटकर, रेणुका धोपट, विश्वनाथ शिर्के यांनी मनोगते व्यक्त केली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि निवेदन मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य विकास आणि संशोधन समिती मुंबई यांच्या वतीने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांचा हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.