
रस्ता दुरुस्त करा अन्यथा२६ रोजी साखळी उपोषण
खेड :- खोंडे येथील ज्ञानदीप शाळेकडे जाणारा रस्ता दुरुस्त करा अन्यथा २६ जानेवारी रोजी पालक- विद्यार्थ्यांना घेऊन साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला .
संतप्त पालकांनी नगरपालिका कार्यालयात जाऊन धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला . यावेळी माजी आमदार संजय कदम , माजी नगरसेवक अजय माने , तानाजी सावंत , मंदार आपटे , अभिजीत पाटणकर , अभिजीत चिखले , प्रसाद पाटणे , भक्ती काळे , अनुष्का सोमण , श्रावणी बांदिवडेकर , आनंद सोमण , लायन्सचे विचारे उपस्थित होते . ज्ञानदीप शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून गेली २५ वर्षे जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे . अनेक वेळा तोंडी सूचना देऊन खेड नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याने २६ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना घेऊन सर्व पालक उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन खेड नगरपालिकेला देण्यात आले . हे वृत्त माजी आमदार संजय कदम यांना समजताच तेही या पालकांना सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले . प्रत्यक्ष प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तिथे बोलवून याबाबत जाब विचारण्यात आला . त्यानंतर प्रशासनाकडून ताबडतोब खड्डे भरण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले .