
रत्नागिरीत भैया सामंतांच्या हस्ते राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन
रत्नागिरी:- राज्यस्तरीय कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा रत्नागिरी मध्ये पहायला मिळत आहे. कुस्ती स्पर्धा आज आणि उद्या २१ जानेवारी दरम्यान शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. याचे उद्घाटन उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून ४४ व्या कुमार राज्यस्तरीय स्पर्धेचे दिनांक २० आणि २१ जानेवारीला आयोजन करण्यात आले आहे. उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे.
या स्पर्धेसाठी राज्यातून ४५० स्पर्धक रत्नागिरीत दाखल झाले आहेत. शनिवारी सायंकाळी सात वाजता सिंधुरत्न समितीचे सदस्य तथा राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व आखाडा पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले गावडे सोबत जिल्हा कुस्ती असोसिएशनचे पदाधिकारी व महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.