
प्रकृती ढासळलेल्या एसटी बस चालकाला वेळेवर उपचार मिळाल्यानं जीवदान
खेड : तालुक्या तून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एसटी बस चालकाची अचानक प्रकृती ढासळली आणि ते बेशुद्ध पडले. अशातच एसटीचे वाहकानं शर्थीचे प्रयत्न करुन या चालकाचा जीव वाचवला. सुदैवानं वेळेवर योग्य उपचार मिळाल्यानं त्याला जीवनदान मिळालं.
खेड एसटी आगारातून ग्रामीण भागात मुक्कामी गेलेल्या एसटी बस चालकाची प्रकृती अचानक गंभीरित्या खालवली. त्यानंतर एसटी बसच्या वाहक कम चालकाने प्रकृती खालवलेल्या चालकाचा शर्थीचे प्रयत्न करून जीव वाचवला आहे.
खेड वाडी जयतापुर ही बस मुक्कामी गेली आणि जैतापूर या ठिकाणी मुक्कामी थांबल्यानंतर चालक ए एन डोंगरे यांची प्रकृती अचानक खालावली आणि ते बेशुद्ध होऊन पडले. हे पाहून घाबरलेले त्या एसटीचे वाहक कमचालक श्री लव्हाळे यांनी रात्रीच्या वेळेला धावत रेंजमध्ये येऊन त्यांनी खेड एसटी आगारात फोन केला व स्थानक प्रमुख यांनी चालकाला तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी सांगितलं. त्यानुसार वाहक श्री लव्हाळे यांनी एसटी चालवून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खेडमधील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
खरं पाहिलं तर वाडी जैतापूर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मोबाईल ला रेंज नाही. याच ठिकाणी आधी वस्तीच्या एसटी कर्मचाऱ्यांना विंचू आणि सर्पदंशाच्या घटना देखील घडल्या होत्या त्यानंतर ही गंभीर स्वरूपाची घटना घडली असून अत्यंत शर्थीने वाहकाने चालकाचे प्राण वाचवले आहेत. वस्तीच्या बस फेऱ्यांवरती जाणाऱ्या चालक वाहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्य परिवहन महामंडळाने या संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी आता प्रवासी आणि चालक वाहकांमधून देखील होत आहे.