
लोकनेते शामरावजी पेजे यांची १०८ वी जयंती उत्साहात संपन्न.
साडेबावीस खेडी कुणबी समाज संघटना, वाटद खंडाळा दशक्रोशी यांचा स्तुत्य उपक्रम.
रत्नागिरी : लोकनेते शामरावजी तथा अण्णासाहेब पेजे १०८ वी जयंती महोत्सव मंगळवार दि. १७ जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथे शेकडो कुणबी बहुजन समाज बांधवांच्या उपस्थित संपन्न झाला.
जगावं कसं व कशासाठी हा जीवन आदर्श घालून देणाऱ्या लोकनेते शामरावजी तथा अण्णासाहेब पेजे हे कोकणातील कुणबी व बहुजन समाजातील लोकांचे महनीय नेते, कष्टकरी वर्गाचे कैवारी म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. कुणबी व बहुजन समाजाचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने, प्रकर्षाने मांडून ते सोडविण्याचे प्रयत्न केले. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक संस्थाचे आधारस्तंभ बनले. राजकीय जीवनात असूनही स्वार्थीपणाला आहूती देवून कुणबी व बहुजन समाजातील लोकांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेवून कुणबी व बहुजन समाजाला योग्य ते मार्गदर्शन व दिशा देण्याचे काम त्यांनी केले.
अण्णासाहेबांची समाजाबद्दलची प्रतिमा केवळ आजच्याच नव्हे तर उद्याच्या, परवाच्या आणि भविष्यातील अनेकानेक पिढयांसाठी जपणे हे एक मोठे समाजकार्य, राष्ट्रकार्यही आहे. असे गौरवोद्गार यावेळी अनेक उपस्थितांनी काढले. साडेबावीस खेडी कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष संजय शितप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती विजय सालिम, माझी जि .प. सदस्य प्रसाद उर्फ बाबूशेठ पाटील, माजी पंचायत समिती सभापती मेघनाताई पाष्टे, सरपंच अमित वाडकर, आप्पा धनावडे, अनिकेत सुर्वे, रजत पवार, डॉ . मधुसूदन वैद्य, सुधाकर जोशी, सत्यविजय खाडे, गावकर सचिन ढवळे, दीक्षाताई निवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
परिसरातील अठरा पगड जातीतील बांधवांसमवेत, साडेबावीस खेड्यातील कुणबी बांधव, खेडेकरी, गावकरी बंधू भगिनी उपस्थित होते. जनसमुदायाला मार्गदर्शन करताना लोकनेते शामरावजी पेजे यांच्या जीवन कार्यावर डॉ. मधुसूदन वैद्य, विजय साळीम, मंगेश सावंत, अनिकेत सुर्वे, मेघनाताई पाष्टे, सचिन ढवळे आदींनी मनोगते व्यक्त केली.
सकाळी ११:००वाजता शामरावजी पेजे जयंती महोत्सव व समाज प्रबोधन सभा संपन्न झाल्यानंतर लगेचच कार्यक्रम स्थळी दुपारी १२:०० ते ५:०० यावेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील प्रसिद्ध भ. क. वालावलकर रूग्णालय ,डेरवण यांच्या सौजन्याने आयोजित या आरोग्य शिबीरासाठी नामांकित डॉक्टर, विशेष म्हणजे वालावलकर रूग्णालयाचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ प्रणव शामराज हे स्वतः या शिबिरासाठी रूग्णसेवेसाठी उपस्थित होते, याचवेळी वाटद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने रक्तचाचण्या करण्यात आल्या शेकडो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. ज्यांना पुढील उपचारासाठी वालावलकर रूग्णालयात जावे लागणार आहे त्यासाठी आयोजक मदत करणार आहेत.
या महोत्सवाची सांगता रात्री कुणबी समाजाचा मौखिक परंपरेने चालत आलेला इतिहास अर्थात बहुरंगी नमनाने झाली. मौजे वाटद येथील काळकाईआई नमन मंडळ, वाटद यांनी आपली कला सादर केली यावेळी परिसरातील हजारो रसिकांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव चौगुले तर सूत्रसंचालन अरुण मोर्ये व प्रदीप भुवड यांनी केले.
जयंती महोत्सव संपन्न करण्यासाठी नंदकुमार बेंद्रे, सुजित दुर्गवळी, नामदेव चौगुले, प्रकाश वीर, मुकुंद वीर, गणपत भुवड, संतोष चौगुले, विनायक कींजळे, विलास बलेकर, भालचंद्र डाफळे, महादेव पाष्टे, निलेश कुरटे, अनिल गोताड, जयेश घवाळी, भरत भुवड, विलास बारगुडे, किरण पागडे, किरण बैकर आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.