
स्टेअरिंग लॉक झाल्याने कारचा अपघात; एकजण गंभीर जखमी
रत्नागिरी:- मारुती मंदिरकडून कोळंबेच्या दिशेने भरधाव वेगात जाणार्या मारुती इको कारचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ही कार जिल्हा रूग्णालयाबाहेरील चहाच्या टपरीत जावून घुसली. या टपरीला लागून असलेल्या विद्युत पोलवर कार आदळल्याने चालकासह अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या चालकाला उपचाराकरिता कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
ही घटना रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास जिल्हा शासकीय रूग्णालयाबाहेर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चालक सुर्यकांत पिलणकर मोटार (क्र. एमएच-०८ एएक्स ६४६१) घेऊन रात्री मारुती मंदिरहून कोळंबे येथे जात होते. मनोरुग्णालय रस्त्यावर उतारात आले असताना अचानक मोटारीवरील ताबा सुटून मोटारीचे स्टेअरिंग लॉक झाले. पिलणकर यांना गाडी आवरता आली नाही. ती थेट जिल्हा रुग्णलयाच्या बाजूला असलेल्या चहा टपरीवर जाऊन आदळली. ही धडक एवढी जोरदार होती की, त्या ठिकाणी इलेक्ट्रीक पोल होता त्याचा जणू इंद्रधनुष्य झाला आहे. इलेक्ट्रीक पोल त्या गाडीच्या बॉनेटला कापून आत गेला. यामध्ये चालकाच्या डोक्यावर तो पोल आदळला. यामध्ये चालक सूर्यकांत पिलणकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर त्यांच्या शेजारी बसलेले महेश दिगंबर चव्हाण (वय ५१, रा. तोणदे, रत्नागिरी) हे देखील जखमी झाले आहेत.
अपघातानंतर रस्त्यावरुन जाणार्या वाहन चालकांनी तात्काळ त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातात चालक सुर्यकांत पिलणकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तात्काळ त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले तर महेश चव्हाण यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी येऊन पंचनामा केला. शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.