
मद्याच्या नशेत प्रौढाचे विषारी द्रव्य प्राशन
रत्नागिरी ः पाचल -बौद्धवाडी (ता. राजापूर) येथील प्रौढाने काजू बागेतील झाडावर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अजय नारायण जाधव (वय ५२, बौद्धवाडी-पाचल, ता. राजापूर) असे विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठच्या सुमारास पाचल येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजय जाधव यांनी मद्याच्या नशेत काजू च्या झाडावर मारण्यात येणारे विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रायपाटण येथील रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.