
खेड बसस्थानकात गर्दीत रोकड अन् मोबाईल लांबवला
खेड:- खेड बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. याच गर्दीचा फायदा उचलत भुरट्या चोरट्यांनी तीन महिलांच्या पर्सवर हात साफ केला. यात रोख रक्कम आणि मोबाईल अशा मौल्यवान वस्तू लांबवण्यात आल्या होत्या. धक्कादायक म्हणजे हे सर्व करणारी एक अल्पवयीन मुलगी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या मुलीमागे तिचे साथीदारही होते. ही सर्व घटना बस स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
गुरुवारी (11 जानेवारी) सायंकाळी 5:55 वाजता रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकात खेड ते बिजघर अशी जाणारी एसटी बस प्लॅटफॉर्म वर लागली होती. बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. याच गर्दीचा फायदा घेत तीन प्रवाशांच्या चोऱ्या झाल्या. तीनही महिला प्रवासी होत्या. त्यांच्या पर्स मधील 7 हजार 500 रुपयांची रोकड आणि मोबाईल अशा वस्तूंची चोरी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. बसमधील सर्व प्रवाशांची झडती घेतली. अखेरीस खेड बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक लहान मुलगी संशयास्पदरित्या गर्दीत इकडून तिकडे फिरताना आढळली.
ज्या महिलेच्या पर्स मधील हजारो रुपयांची रोकड चोरीला गेली आणि दुसऱ्या महिला प्रवाशाच्या मोबाईची चोरी झाली त्यांच्याच पाठीमागे ती संशयास्पद मुलगी काळी ओढणी हातावर घेत फिरत होती. तसेच बसमध्ये चढणाऱ्यांची गर्दी कमी होऊ लागल्यानंतर तिने तिकडून पळ काढला. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर खेडचे पोलीस निरीक्षक नितिन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. साधारण सर्व झोपडपट्ट्यांमधून पहिल्यांदा पाहणी केली. अखेरीस खेड रेल्वे स्थानकात ही संशयास्पद मुलगी आढळली. पोलिसांनी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी केली असता तिच्याकडे चोरीला गेलेल्या सर्व मुद्देमाल आढळून आला. थोडा वेळ झाला असता तर ती अल्पवयीन मुलगी आणि तिच्यासोबत असणारे तिचे लोक रेल्वेने पसार झाले असते. मात्र, खेड पोलिसांनी कमालीची चक्रे फिरवून चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवला. चोरीची घटना घडल्यानंतर अवघ्या दीड तासात या चोरीचा छडा लावणाऱ्या खेड पोलिसांचे कौतुक होत आहे.