
पीएम किसान योजनेच्या १६ व्या हफ्त्यासाठी करा आधार सीडिंग
रत्नागिरी:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या व ई केवायसी, आधारसीडिंग व भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे प्रलंबित असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपृक्तता मोहिमे दरम्यान १५ जानेवारी पर्यंत आपल्या प्रलंबित असलेल्या नोंदी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी, सामायिक सुविधा केंद्र व संबंधित तहसीलदार कार्यालय यांचेशी संपर्क साधून पूर्ण कराव्यात जेणेकरून शासनाकडन प्रस्तावित देय असणारा सोळावा हप्त्याचा लाभ आपणास मिळेल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. सुनंदा कुन्हाडे यांनी केले आहे.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्तता साध्य करण्यासाठी दिनांक 6 डिसेंबर 2023 ते दिनांक 15 जानेवारी 2024 या कालावधीत गाव पातळीवर मोहीम राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. माहे जानेवारी 2024 च्या शेवटच्या आठवड्यातील पीएम किसान योजनेचा प्रस्तावित सोळावा हप्ता वितरित करण्याचे शासनाचे नियोजन आहे.
या योजनेमध्ये जिल्ह्यातील एकूण 1,65,048 लाभार्थी सहभागी असून यामधील ई केवायसी प्रलंबित असलेले 5266, बँक खाते आधार संलग्न नसलेले- 16786 तसेच भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेले-10115 लाभार्थी प्रलंबित आहेत. आधार सीडींगसाठी पोस्ट खाते, सामायिक सुविधा केंद्र व बँक व्यवस्थापन यांच्या मदतीने तर ई केवायसी करिता जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये नियुक्त केलेले ग्रामस्तरीय व्हिलेज नोडल अधिकारी (VNO) व सामायिक सुविधा केंद्र यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेले लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात येणार असून नवीन पात्र लाभार्थ्यांचा पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. आधारसीडिंग प्रलंबित असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे.