
जीआर मिळेपर्यंत बेमुदत संप
आशा ,गटप्रवर्तक महिलांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने
रत्नागिरी:आशा आणि गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर झाल्या असल्या तरी शासनाने अजून लेखी आदेश काढलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर सध्या या महिलांनी ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आहे. तसेच १२ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी याबाबत निवेदन देऊन जि.प. समोर निदर्शने केली.
आरोग्यमंत्र्यांनी आशांना सात हजार रुपये व गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये वाढ आणि आशा व गटप्रवर्तकांना दोन हजार रुपये दीपावली भेट जाहीर केली होती. मात्र याबाबत लेखी आदेश अजूनही निघालेले नाहीत. त्यामुळे सध्या सगळीकडेच असंतोष निर्माण झाला आहे. हे लेखी आदेश लवकरच निघण्यासाठी संघटनेने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. २९ डिसेंबरपासून ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
मागण्यांसाठी पुन्हा एकदा संपाच हत्यार उपसण्याचा निर्णय आशा व गटप्रवर्तक महिलांनी घेतला आहे. सोमवारी जिल्हा परिषदसमोर सकाळी ११ वाजता सर्व आशांनी एकत्र येत घोषणाबाजी करत निदर्शने केली. तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीतर १२ जानेवारीपासून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहेे. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे. जि.प.चे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्याकडे हे निवेदन संघटनेचे राज्याध्यक्ष शंकर पुजारी यांनी दिले.सर्व जमलेल्या आशा गटप्रवर्तक महिलांचे नेतृत्व महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक आयटक जनरल सेक्रेटरी काँ सुमन पुजारी यांनी केले.यावेळी महाराष्ट्र आयटक कामगार संघटनेचे राज्य सचिव कॉ शंकर पुजारी, रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्ष विजया शिंदे ,जनरल सेक्रेटरी विद्या भालेकर उपाध्यक्ष पल्लवी पारकर ,संचिता चव्हाण, तनुजा कांबळे संजीवनी तिवडेकर सोनाली बाईक व गटप्रवर्तक गावडे ,उर्मिला पाटील, मनीषा कदम, अफसाना शिकलगार,विद्या पाटील, मनीषा पाटील, सीमा ठुमके, शुभांगी सावंत, इंदिरा जाधव, सुषमा कांबळे ,नीलम पाटील व वैशाली घोरपडे उपस्थित होत्या.

गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये , कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क तसेच आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व भाऊबीज देण्याची मागणी असून रत्नागिरी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी या संपामध्ये जोरदार भागीदारी करावी असे आवाहन कॉ सुमन पुजारी यांनी केले.