
दापोली येथे महिलेची ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या
दापोली:-दापोली शहरालगत असणाऱ्या खोंडा या परिसरात जरीना जमादार या 35 वर्षीय महिलेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार दिनांक 7 जानेवारी रोजी संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची खबर देणारे अब्बास अली जमादार (वय 37 राहणार मूळ तेलली तालुका इंडी जिल्हा विजापूर कर्नाटक) हे खोंडा येथे राहतात. रविवारी सकाळी मयत पत्नी जरीना व अब्बास अली यांच्यामध्ये घरगुती वाद झाला होता. वाद झाल्यानंतर जरीना रागाने राहत्या ठिकाणाच्या मागील बाजूस असलेल्या जंगलमय भागामध्ये निघून गेली होती. त्या ठिकाणी तिने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास ती गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. तिला उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली असता ती मयत असल्याचे घोषित केले. दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.