
गावतळेत ५ लिटर गावठी दारू जप्त
दाभोळ : दापोली तालुक्यातील गावतळे येथील हनुमान नगर येथे विनापरवाना गावठी हातभट्टी दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईथ ५६० रुपयांची ५ लिटर गावठी दारू जप्त केली. संशयिताविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश सुरेश पवार (वय ३८, रा. गावतळे) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ३० डिसेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास गावतळे येथे निदर्शनास आली. गावतळे- हनुमाननगर परिसरात विनापरवाना गावठी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस कारवाई केली. या कारवाईत संशयित एका बंद टपरीच्या आडोशाला दोन प्लास्टिक कॅन घेवून बसलेला आढळला. या कॅनची तपासणी केली असता त्यात गावठी दारू आढळून आली.