
आरएचपी फाउंडेशनतर्फे शबीना शेख हिला व्हिलचेअर
रत्नागिरी : रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे कुडाळ येथील शबीना अल्लाबक्ष शेख हिला अत्यावश्यक असलेली व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात आली. यापूर्वी तिची वापरातील व्हिलचेअर खराब झाल्याने तिने आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांच्याकडे नवीन व्हिलचेअरची मागणी केली होती. त्याप्रमाणे आरएचपी फाउंडेशनतर्फे शबीनाला नवीन व्हीलचेअर देण्यात आली.
दिव्यांगांच्या आधारस्तंभ नसीमा हुरजूक यांच्या कुडाळ येथील स्वप्ननगरी काजू प्रोसेसिंग युनिटमध्ये शबीना नोकरी करते. या व्हीलचेअरमुळे ती अधिक जोमाने काम करू लागली आहे. व्हीलचेअर चालविण्याचा त्रासही कमी झाल्याने शबीना खुप खुश झाली. तिने संस्थेचे नवीन व्हिलचेअर दिल्याबद्दल खुप खुप आभार मानले. शबीनाच्या कथाही वेगळी आहे. शबीना अल्लाबक्ष शेख (वय ३४) हि सहा महिन्यांची होती, त्यावेळी ताप आला व त्यानंतर दोन्ही पायांना पोलिओ झाला. कमरेपासून खालील भागाला अपंगत्व आले. वडील दुबईला होते व आई गुलशन शेख घरकाम करायची. शबीना सहा वर्षाची असताना त्यांना वडील सोडून बेपत्ता झाले ते आजतागायत परत आलेच नाहीत. अशा स्थितीत आईने घरकाम करून मुलांना सांभाळले. शबीनाला आजी शाळेत घेऊन जायची. तिसरीपर्यंतचे शिक्षण कोपरखैराणे मुंबई येथे झाले.
शबीनाच्या चुलत्यांना कोल्हापूरमधील हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप संस्थेची माहिती मिळाली. त्याप्रमाणे तिथे जाऊन शबीनाला घरोंदा हॉस्टेलमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तिला ऑर्थोपेडिक डॉक्टरांना दाखवून नंतर पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ती कुबड्या आणि कॅलिपरच्या सहाय्याने चालू लागली. चौथी ते सातवीपर्यतचे शिक्षण कोल्हापूरमध्ये घेतले. अभ्यासात फार हुषार नसल्याने तिला २००७ मध्ये संस्थेच्या स्वप्ननगरी प्रकल्पात काजू युनिटमध्ये काम शिकण्यासाठी पाठवले. तिथे ती अर्थार्जन करुन स्वत:च्या पायावर उभी राहिली. स्वप्ननगरी प्रकल्प बारा एकर जमिनीत उभा आहे. तिथे खूप अंतर चालायला लागायचे. कॅलिपर कुबड्या घेऊन एवढे चालणे जमत नव्हते. मग ती कामाच्या ठिकाणी व्हिलचेअरचा वापर करायला लागली. दरम्यान, स्वप्ननगरीमध्ये तिच्यासोबत काम करणारा तिचा सहकारी अल्लाबक्ष शेख याच्याशी ओळख झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि नसीमादीदी आणि तिच्या आईच्या संमतीने दोघांचे २०१० साली लग्न करून दिले. त्यांनी स्वप्ननगरीला स्टाफ क्वार्टरला संसार थाटला. त्यांना २०११ साली मुलगा झाला.