
जप्तीचे सामान गणपतीपुळे ग्रामपंचायत आवारातून परस्पर नेल्याबद्दल तक्रार
रत्नागिरी :तालुक्यातील गणपतीपुळे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायतीमार्फत दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी गणपतीपुळे समुद्रकिनारी अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई करून सामान जप्त करण्यात आले होते. सदरचे जप्तीचे सामान ग्रामपंचायत गणपतीपुळेचे सरपंच यांच्या परवानगीशिवाय ग्रामपंचायत आवारातून परस्पर नेल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळाली.
सदर जप्तीचे सामान परत घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडे कोणताही अर्ज करण्यात आलेला नाही. अथवा दंड भरण्यात आलेला नाही, असे सरपंच ग्रामपंचायत गणपतीपुळे व सदस्य यांनी ग्रामस्थांना सांगितले. त्यामुळे या अनुषंगाने सदर मनमानी कारभार असलेल्या प्रकरणाची विशेष लक्ष घालून सखोल चौकशी करावी, अशा स्वरूपाचे लेखी निवेदन गणपतीपुळे येथील चार जागरूक ग्रामस्थांनी दिले आहे. तसेच ग्रामपंचायतीची मालमत्ता ग्रामपंचायतीच्या आवारातून उचलून नेणाऱ्यास व यामध्ये सहभागी असणाऱ्या संबंधित व्यक्तींना योग्य ते शासन व्हावे, अशा मागणीचेही लेखी निवेदन गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर गणपतीपुळेतील जागरूक ग्रामस्थ विश्वनाथ पालकर, दत्ताराम सुर्वे, समीर कदम व मंगेश गोताड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. एकूणच गणपतीपुळे समुद्र किनारी अतिक्रमण झालेल्या कारवाईबाबत मनमानी कारभार करून कारवाई केली जात असल्याचा आरोप करण्यात आला असून गणपतीपुळे येथील जाणकार ग्रामस्थांमधून तीव्र संताप व नाराजी व्यक्त होत आहे.