
जिल्हा पोलिसांचे मिशन थर्टीफर्स्ट
चिपळूण : नववर्षाच्या आगमनास काही दिवस उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे तितक्याच जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले असताना पोलिसांनी कंबर कसली आहे. सध्या पोलिसांकडून हॉटेल, लॉज, कॉटेजचालक यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. अंमली पदार्थांची विक्री होत असल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. रत्नागिरी पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात असलेली सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. नाताळ आणि त्यानंतर नववर्षाच्या स्वागतासाठी येथील हॉटेल, लॉज, कॉटेजेस यांची शंभर टक्के बुकिंग १५ दिवसांपूर्वीच झाली आहे. राहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची ओळख पटल्याशिवाय परवानगी देऊ नये, अशा सूचना देण्यात येत आहेत. यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाला आधारकार्ड, ड्रायव्हिंग परवाना, वाहनांची कागदपत्रे बाळगणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर तपासणी नाके तयार करण्यात येणार असल्याची माहिती खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी दिली. थर्टीफर्स्टनिमित्त पर्यटक, व्यावसायिक जय्यत तयारी करत असताना ड्रग्स तस्करही आपले जाळे विस्तारित आहेत. पूर्वी मर्यादित असलेला अंमली पदार्थाचा व्यापार आता ग्रामीण भागात पसरत आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर आदी ठिकाणी पोलिसांनी यापूर्वी कारवाया केल्या आहेत. त्यामुळे थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अलर्ट झाले आहे.
चौकट
ग्राहकांची माहिती देणे गरजेचे
पुढील काही दिवसात जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, पार्ट्यांचे आयोजक, पर्यटक वाहतूक व्यावसायिक, स्थानिक पोलिस पाटील यांची बैठक बोलावण्यात येणार आहे. यातून संशयित व्यक्तींवर नजर कशाप्रकारे ठेवावी याची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर पार्ट्यांची माहिती, त्यांच्या आयोजकांची माहिती, किती व्यक्ती उपस्थित राहणार यांची माहिती गृह विभागाला द्यावी लागणार आहे.
शकोट
थर्टीफर्स्टचा आनंद लुटण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. शांततेत तो सर्वांना उपभोगता आला पाहिजे यासाठी रत्नागिरी पोलिस मेहनत घेत आहेत. ड्रग्ज सप्लाय रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर काम केले जात असून, कोणालाही याची माहिती मिळाल्यास पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर बाहेरून येणारा ड्रग्ज, दारूचा साठा रोखण्यासाठी खेडमधील भरणेनाका, वेरळ आणि कशेडी येथे चेकपोस्ट असणार आहेत. चेकपोस्टवर नाकाबंदी केली जाणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाला यातील एकातरी चेकपोस्टवरून जावे लागेल. त्या ठिकाणी एक महिला कर्मचाऱ्यांसह तीन कर्मचारी नेमले जाणार आहेत. गुहागर आणि दापोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांवर आमची करडी नजर असणार आहे.